प.पू. सद्‍गुरु ॐ मालती देवी

कलियुगात परमेश्वर प्राप्तीचा सुलभ मार्ग (ध्यानयोग) दाखविणाऱ्या प.पू. सद्‍गुरु ॐ मालती देवी या अतुलनीय मनोनिग्रह व कठोर साधनेच्या बळावर पूर्णत्वाला पोहोचून त्यांना ‘सद्‍गुरु’ पद प्राप्त झाले. प.पू. आईंनी एकानाथांप्रमाणे नेटका प्रपंच केला, तर तुकारामांच्या उक्तीप्रमाणे ‘ठायीच बसोनी करावा एकचित्त ‘ याप्रमाणे घरीच साधना करून अध्यात्माचे उच्च शिखर गाठले. प.पू. स्वामी शिवानंद सरस्वती (हृषीकेश) हे प.पू. आईंचे सद्‍गुरु. प.पू. आईंचा जन्म गुरुवार, दि. २० सप्टेंबर, १९२३ संतांच्या पावन चरणांनी पुनीत झालेली भूमी मिरज येथील ब्राह्मणपुरीत करमरकर घराण्यात झाला.

आईच्या निधनानंतर त्यांच्या पित्यांनी त्यांचा विवाह श्री गणेश हरी बाळ यांच्या सोबत केला.करमरकर व बाळ दोन्ही घराणी धर्मपरायण व इतिहासप्रसिद्ध होती. श्री बाळ नोकरीनिमित्त दिल्लीस होते. १९५६ च्या मे महिन्यात बाळ कुटुंब दिल्लीहून ऋषिकेश ला पंधरा दिवस राहावयास गेले. परत येताना प. पू. स्वामी शिवानंदांनी आईंना एक पुस्तक दिले. “बेटा, तू हे पुस्तक जरूर वाच” असे सांगितले. पुस्तक वाचून आईंना ध्यान करण्याची प्रेरणा निर्माण झाली. दुसऱ्या भेटीत स्वामीजींनी पुन्हा, “ध्यान करो” म्हणून सांकेतिक गूढ भाषेत संदेश दिला. तेथ पासून नंतर प. पू. आईंचा ध्यानाचा अभ्यास वाढला. आईंना ध्यानाच्या माध्यमातून प. पू. स्वामीजींचे मार्गदर्शन मिळूलागले. त्यांनी वेळो वेळी अडचणींचे, शंकांचे निवारण ध्यानातून केले व साधना पूर्ण करून घेतली.

संसारात राहून आईनी कठोर साधना, अतुल गुरुनिष्ठा याद्वारे निर्भेळ आनंद प्राप्त करून घेतला. कुटुंबाच्या सेवेतही आई तितक्याच तत्पर असत. त्यांनी माता, गृहिणी, पत्नी या सर्व जबाबदाऱ्या तेवढ्याच समर्थपणे पेलल्या. त्यांनी ऐहिक व पारमार्थिक दोन्ही बाजूंनी प्रभूला ओळखले. आपल्या सुख-दु:खात, प्रपंचात मोक्ष व परमार्थ आहे हे त्यांनी आपल्या आचरणाने दाखवून दिले. त्यांनी श्रीमंत, गरीब, जात, पंथ, भेद न बाळगता अनेकांना शाश्वत सुखाची वाट दाखवली. प.पू. आईंच्या स्मरणाने, चिंतनाने, सत्संगापासून, प्रवचनातून आत्मिक शांतीचा लाभ होतो. त्यांच्या अमृतमय प्रवचनाचे रसपान करताना मनुष्य अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करतो, दुर्गुणांना दूर सारून स्वत:त सुधारणा करतो.

नम्र स्वभाव, मधुर-वाणी, कुणालाही शब्दांनी न दुखावण्याची वृत्ती, ममत्व, अमृता प्रमाणे वर्षाव करणारा नेत्रामधील वात्सल्यमय भाव या सर्व गुणांनी साधक प.पू. आईंकडे लोह-चुंबकाप्रमाणे आकर्षिले जातात. प.पू. आईंच्या मार्गदर्शना खाली अनेक साधकांचा ध्यानयोग प्रवास सुरु आहे. घरात राहून परमात्म्याला हृदयमंदिरात शोधा, विश्व चैतन्याशी संधान जोडा, असे त्या तळमळीने सांगतात. प. पू. आई म्हणतात,” सद्‍गुरु प्राप्त करायचा नाही, तर सद्‍गुरुने जे प्राप्त केले ते प्राप्त करायचे आहे. गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे. देहाच्या माध्यमातून ते तत्व प्रकट झालेले आहे. असे कित्येक देह आले आणि गेले. परंतु तत्व चिरकाल टिकले आहे. म्हणून सद्‍गुरु मधील व्यक्ती न पाहत तत्व पाहायला शिका.”

तपोवन

संत श्रेष्ठ श्री तुलसीदासांनी ‘रामचरित मानस’ या ग्रंथात साधू- संतांना ‘ जंगम तीरथराजू’ म्हणजे चालते बोलते तीर्थराज म्हणजे प्रयागतीर्थ म्हटले आहे. ‘ तीर्थी कुर्वान्तितीर्थानि’ स्वान्तःस्थे गदाभृता (भगवत) म्हणजे संतांच्या वास्तव्याने तीर्थांना पावन असे ‘ तीर्थत्व प्राप्त होते. संत ज्या ठिकाणी राहतात. ते स्थानच तीर्थ बनते. असेच एक पावन तीर्थ म्हणजे आमचे ‘ ॐ मालती तपोवन’.मिरज- म्हैसाळ रोडवर, मिरजेपासून ७ कि.मी. अंतरावर ‘ॐ मालती तपोवनाची’ पवित्र वस्तू आहे.

१९९० सालच्या जुलै महिन्यात प्रथम संस्थेची नोंदणी झाली. श्री बसगौंडा शिवबसू बसरगी यांच्याकडून १ एकर जमीन संस्थेस दान मिळाली. प्रथम एक गवताची झोपडी ‘ॐ साधना कुटीर’ बांधण्यात आली. त्यानंतर भावमान्दिर, साधक निवास, हनुमानमंदिर अन्नपूर्णा, शांतीमंदिर असे क्रमवार बांधकाम झाले. साधनकुटीरला लागून प. पू. मालती आईंचे संगमवरी समाधी मंदिर आहे. तपोवनात ४ मोठे व इतर छोटे उत्सव साजरे केले जातात. विष्णुयाग, गोकुळाष्टमी, रामनवमी, दासनवमी, प. पू. स्वा. शिवानंद जयंती, प. पू. आईंची पुण्यतिथी, हे उत्सवही साजरे केले जातात.
१९९९ सालापासून मोठ्यांचे व लहानांचे निवासी अध्यात्मिक शिबीर मे महिन्यात घेतले जाते. दर महिन्याला विशेष साधना शिबीर घेण्यात येते. दर वर्षी साधकांची पायी दिंडी निघते. नैसर्गिक आपत्तीत मदत करणे , मोफत आरोग्य शिबीर आयोजित करणे, रक्तदान शिबीर, आसपासच्या अनाथ आश्रमास मदत करणे, सांगली मिरज परिसरातील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करणे, त्यांना शालोपयोगी साहित्य पुरविणे इत्यादी कार्यही होते असते. तपोवनात येणाऱ्या साधकांमध्ये गृहस्थ साधकांची संख्या जरी जास्त असली तरी येथे संन्यास परंपराही जपली गेली आहे.
पू. आई प्रसिद्धीपरांग्मुख होत्या. त्यांचे संपूर्ण चरित्र हा अमानित्वाचा एक मूर्तिमंत पाठ आहे. या तपोवानाची निर्मितीच शिष्य साधकांना एका अध्यात्मिक साधनेसाठी योग्य अशा शांत, पवित्र वातावरणात राहता यावे, यासाठी झालेली आहे.

ध्यान मार्ग

परमेश्वर या जगात सर्वत्र आहे तसाच तो तुमच्यात सुद्धा आहे. म्हणूनच तो बाहेर कुठेही शोधण्याऐवजी अंतर्मुख होऊन शोध घ्या.

आत्मसाक्षात्कार म्हणजेच ईश्वर प्राप्ती होय आणि ध्यानयोग हा आत्मसाक्षात्काराचा सुलभ मार्ग आहे.कलियुगात धावपळीच्या जीवनात अर्थार्जनासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कालानुरूप स्त्री व पुरुष दोघांच्याहि जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. धकाधकीच्या जीवनात असा त्रासलेला मनुष्य बाह्य जगतात आनंद शोधण्याच्या प्रयत्नात असतो. बाह्य जगातील सुख हे नाशवंत आहे, परंतु अंतर्मुख झाल्यानंतर होणारी वैश्विक आनंदाची अनुभूती चिरकाल टिकणारी आहे. ध्यान म्हणजे शब्द आणि विचार यांच्या पलीकडे जाणे

प्राणायाम व योग ही ध्यानाची पहिली पायरी आहे. प्राणायामामुळे नाडीशुद्धी होते, मन शांत, स्थिर होते, तर योगासनांमुळे शरीर सुदृढ होते. आळस दूर होउन चैतन्य शक्तीचा विकास होतो. नाडीशुद्धी व विचारशुद्धी झाल्याशिवाय ध्यानमार्गात प्रगती शक्य नाही. नामस्मरणामुळे सद्‍गुरु व इष्ट देवतेशी अनुसंधान साधण्यास सहाय्य होते.आहार आणि मन यांचा खूप घनिष्ट संबंध आहे. आहारामुळे सत्व, रज, तम या गुणांची वृद्धी होते. म्हणून आहार नेहमी सात्विक, पौष्टिक पण हलका असावा.

प. पू. आईंनी ध्यानासंदर्भात सांगितलेल्या काही महत्वाच्या सूचना:

  • ध्यानाला बसताना दर्भ किंवा कांबळे आसन म्हणून वापरावे. त्यावर शुभ्र वस्त्र अंथरावे.
  • अशा आसनावर साधकाने उत्तराभिमुख बसावे. हिमालयात साधना करणाऱ्या तपस्वींच्या सकारात्मक उर्जेचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असतो. त्याचा लाभ साधकाला होतो.
  • ध्यानाला बसण्याचा वेळा:
  • ब्राह्ममुहूर्त : पहाटे  ३.३० ते ६.०० हि वेळ ध्यानासाठी सर्वोत्तम सांगितली आहे. कारण यावेळी वायुमंडल पवित्र असते तसेच सभोवताली शांतता  असते .
  • गृहिणींसाठी सकाळी ११ ची वेळ सुद्धा चांगली असते कारण या वेळेपर्यंत सकाळच्या दैनंदिन जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात.
  • दिवे लावणिची संध्याकाळची ७ ची वेळ सुद्धा योग्य असते.
  • रात्री ११ ते ३ या वेळेत ध्यानाला बसू नये.
  • ध्यानाला बसण्याआधी तीन वेळा प्रणवोच्चार करावा, गुरुस्मरण करावे आणि ध्यानाला प्रारंभ करावा.
  • ध्यानातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तीन वेळा प्रणवोच्चार करावा.  थोडक्यात सांगायचे तर ध्यान म्हणजे निर्विचार, मनोजय स्थिती.
  • ध्यानसाधना करणाऱ्या शिष्याची कुंडलिनी सद्‍गुरु जागृत करतात आणि साधकाचा आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रवास सुरु होतो.
  • तुम्ही साधनेच्या दिशेने एक पाउल टाकले तर सद्‍गुरु पुढील दहा पावले तुम्हाला उचलून घेऊन जातात.